
कॅलेंडरवरचा शेवटचा दिवस जणू वेगळीच शांतता घेऊन येतो. दैननदिन कामं तशीच सुरू असतात, पण मन मात्र थोडं थांबतं. रोजच्या धावपळीत न सापडलेली एक पोकळी या दिवसांत अचानक जाणवते… मागे वळून पाहण्याची आणि स्वतःशी थोडं बोलण्याची गरज जाणवते.
पण हे सगळं फक्त माझ्याच बाबतीत घडतय का? की वर्षाच्या शेवटी प्रत्येकाचंच मन असंच थोडंसं चंचल असतं?
या प्रश्नाचं उत्तर कदाचित कुठेही सापडणार नाही.
वर्षाचा शेवट म्हणजे प्रत्येकासाठीच एक अदृश्य थांबा असतो. काही जण त्याला साजरा करतात, काही दुर्लक्ष करतात, तर काही फक्त शांतपणे अनुभवतात.
तसं या वर्षात बरंच काही घडलं.. देशातही आणि वैयक्तिक आयुष्यातही.
देशपातळीवरच्या घटनांनी मन थरथरायला लावलं; काही बातम्यांनी भीती निर्माण केली, काही प्रसंगांनी शांततेचा अनुभव दिला, तर काही वेळा विचार करायला भाग पाडलं. बातम्यांमधून, चर्चांमधून सतत काहीतरी घडत राहिलं, आणि आपण ते सगळं पाहत, ऐकत, स्वीकारत राहिलो. काही प्रसंगांनी आशा दिली, तर काहींनी मनावर प्रश्नचिन्ह उमटवलं.
पण खरी उलथापालथ वैयक्तिक आयुष्यातच होते, कारण तिथे कुठलाही मुखवटा परिधान केलेला नसतो. या वर्षात काही स्वप्ने पूर्ण झाली, तर काही अपुरी राहिली. काही निर्णय योग्य वाटले, तर काहींचे ओझे हळूहळू जाणवू लागले. काही माणसं आयुष्यात जवळ आली, तर काही नकळत दूर गेली. काहींचे विचार पटले नाही, तर काहींच्या वागण्याने मनाला त्रासही झाला. खरं तर कोणाशी किती आणि कसं बोलायचं, हे सगळं वेळ येईपर्यंत कळलच नाही. त्यांच्या वागण्याने किंवा अचानक झालेल्या बदलामुळे काही प्रश्न मागे राहिले, पण त्याच वेळी काही गोष्टी स्पष्टही झाल्या.
या अनुभवांनी हे शिकवलं की सगळं आधीच समजणं शक्य नसतं. आपल्यासाठी कोणती माणसं योग्य आहेत आणि कोणती अयोग्य, हे वेळ आणि अनुभवच सगतो. काही गोष्टीरूपी नात्यांचा शेवट जरी झाला नाही तरी त्याला थोडासा अल्प विराम नक्कीच असतो… माझ्यासाठी तो आवश्यकही आहे. कारण त्या अंतरामुळेच स्वतःकडे पाहायला वेळ मिळतो.
एकंदर पाहता हे वर्ष ठीकठाक होतं. पण कदाचित आयुष्य बहुतेक वेळा असंच असतं… रोजच्या छोट्या संघर्षांत, साध्या आनंदांत, आणि संध्याकाळी स्वतःशी झालेल्या शांत संवादात…
आता नव्या वर्षाचे वेध लागले आहेत. नवे कॅलेंडर हातात घेताना मन पुन्हा थोडे हलके होते. कोरी पाने पाहताना वाटते… यावेळी काही गोष्टी वेगळ्या कराव्यात. पण दर वर्षीप्रमाणेच, याही वर्षी मनात एक साधीच इच्छा आहे… नव्या वर्षात सगळं चांगलं होईल, फक्त आता ‘चांगलं’ या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. नाही मोठ्या अपेक्षा, नाही मोठी आश्वासने. फक्त इतकंच हवंय की…
नव्या वर्षात मन थोडं हलकं होवो,
आशा मंद प्रकाशासारखी उजळो.
जखमा जपल्या तरी चालतील,
प्रश्न उरले तरी चालतील,
पण जीवनाचा प्रवास हळूहळू
आपल्याला घडवत राहो.
जुनी आठवण, नवी शिकवण,
आणि शांत आशा… यातूनच
नव्या वर्षाची खरी सुरुवात होते.
सर्व वाचकांना आगामी नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेछा.



Leave a comment