“काही आठवणी इतक्या गहिऱ्या असतात की त्या शब्दांत मांडतानाही मन भरून येतं… आठवणींच्या गर्दीत स्वतःला शोधण्याचा हा एक प्रयत्न.”
डोळे मिटून तुला आठवायचं का,
की मनातल्या मनात सगळं साठवून ठेवायचं?
त्या आठवणींना हळूच स्पर्श करायचं,
की त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचं?
त्या जुन्या रस्त्यावर जावा का पुन्हा,
कदाचित तू भेटशील नव्याने मला?
की फक्त शांत बसून स्वप्नांत शोधावं तुला,
आणि मनाशीच बोलत राहावं पुन्हा?
फुलांच्या सुवासात तुला शोधायचं,
की काळजाच्या स्पंदनात ऐकायचं?
वाऱ्याच्या झुळुकीत तुझा स्पर्श शोधायचा,
की आठवणींच्या सागरात विरून जायचं?
चंद्राला विचारावं का तुझ्या बद्दल,
की ताऱ्यांमध्ये तुझं अस्तित्व शोधायचं?
शब्दांत तुला मांडावं का पुन्हा,
की तुझी गाणी ऐकून मन रमवायचं?
वेळेला सांगावं का थोडं थांबायला,
की भूतकाळाच्या सावल्या कुरवाळायच्या?
आठवणींना मनात अलगद साठवायचं,
की नकळत त्यांच्यात हरवून जायचं?
सांग ना…
तुझी आठवण आली की, काय करायचं?
अश्विनी कुलकर्णी
13/01/2026



Leave a comment