“शब्दांतून व्यक्त होणारी ओढ आणि मौनातून उमजणारा जिव्हाळा; एका खास व्यक्तीशी बोलताना हरवलेल्या वेळेची आणि मनाला जडलेल्या संवादाच्या छंदाची ही एक प्रांजळ कबुली.”
कधी शब्दांत तर कधी मौनात,
एक वेगळाच आनंद लाभला…
तुझ्याशी गप्पा मारता मारता,
तुझ्या आठवणींत जीव हा रमला,
मला तुझ्याशी बोलण्याचा छंद लागला.
काहीही न बोलता तू खूप काही सांगतोस,
हसता हसता मला हळूच सावरून घेतोस;
तुझ्या शब्दांच्या या सुंदर पाऊलवाटेवर,
माझा हा जीव आता पुन्हा पुन्हा गुंतला,
काय सांगू मला.. तुझ्याशी बोलण्याचा छंद लागला.
वेळेचं भान उरत नाही, जगाचा विसर पडतो,
तुझा एक मेसेज आला की चेहरा उगीचच फुलतो;
मनातल्या साऱ्या साठवलेल्या गुपितांचा,
तुझ्यासमोर आज हा बांध फुटला,
मला तुझ्याशी बोलण्याचा छंद लागला.
नाते कोणतेही असो, पण संवाद आपला खास आहे,
तुझ्या शब्दांत लपलेला मायेचा एक भास आहे;
हा छंद असाच राहू दे आयुष्याच्या वळणावर,
तुझ्यामुळे मला जगण्याचा नवा अर्थ लाभला,
मला तुझ्याशी बोलण्याचा छंद लागला.
@poeticanchor_ash
अश्विनी कुलकर्णी
23/01/2026


Leave a comment