संध्याकाळच्या पावसातल्या थेंबांमध्ये हरवलेली एक भेट, न बोललेली नजर, आणि त्या क्षणाची आयुष्यभराची आठवण.
काही जण आयुष्यात जणू एका थेंबासारखे येतात.. क्षणभर टिकतात, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर उजळत राहतात... 🌧️✨
एका पावसातल्या अनमोल क्षणाची कल्पना म्हणून ही काल्पनिक गोष्ट मी लिहिलेली आहे.
लेखिका: अश्विनी कुलकर्णी (01/10/2025)
पावसात ती बसस्टॉपवर, बसची वाट बघत बाकावर बसली होती. संध्याकाळ सरत रात्र झाली होती आणि ती छत्री ऑफिसमध्ये विसरली होती. पावसाचे थेंब अंगावर पडत गारवा देत होते.
त्याच्या येण्याची तिला अजिबात चाहूलही नव्हती. पावसाच्या सरींमध्ये हरवलेल्या त्या क्षणी, तो शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसला. काही न बोलता त्याने हातातली छत्री अलगद तिच्याकडे सरकवली… आणि स्वतः मात्र भिजत राहिला.
क्षणभर तिला काही कळलेच नाही. वळून पाहिलं तर बसस्टॉपच्या मंद दिव्यात त्याचा चेहरा, सौम्य हसू आणि उंच बांधा तिला स्पष्ट दिसत होता. त्या ओल्या हवेत जणू अनोळखी क्षणांची नवी कहाणी उमटत होती. आणि सगळं जग थांबल्यासारखं तिला भासत होतं.
तो हलकासा हसला आणि म्हणाला,
“ही घ्या छत्री …”
नकळत तिचे शब्द थांबले. पावसाच्या आवाजात त्याचा आवाज एखाद्या सुखावणाऱ्या सुरासारखा वाटत होता. आता बस जरा उशिराने आली तरी चालेल… असा विचार करत तिने छत्री घेतली आणि हलकेच पुटपुटली—
“थँक यू…”
थोड्या वेळाने बस आली. लोकांची गर्दी झाली.
पण ती त्या क्षणात हरवलेली, नकळत त्याच्याकडेच पाहत होती.
त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं वाचन होतं—
जणू अनकथित शब्द, न उच्चारलेली भावना… जी थेट तिच्या मनापर्यंत पोहोचत होती.
तो फक्त नजरेतून म्हणाला,
“जा, उशीर होईल…”
त्याच्याकडे पाहत ती बसमध्ये चढली, पण खिडकीतून मागे पाहिलं तर तो अजूनही पावसात भिजत उभा होता.
बस सुटली. दिव्यांच्या प्रकाशात आणि पावसाच्या धुकट ओलाव्यात तो क्षण तिच्या मनात कोरला गेला. तो नेमका का जवळ बसला..? का छत्री पुढे केली..? हे कोडं कधीच सुटणारं नव्हतं, पण त्या साध्या भेटीतला पावसाचा प्रत्येक थेंब तिच्या आठवणीत आयुष्यभर राहणार होता. त्या रात्रीचा पाऊस, त्याचं मिश्किल हास्य आणि त्याची सावली.. सगळं काही कायमस्वरूपी मनात कोरलं गेलं. ना वचन, ना संवाद… फक्त एक न संपलेली गोष्ट, आणि परत कधी तरी भेट होईल ही इच्छा, हृदयात हलकेच घरकरून राहिली..
धन्यवाद
@poeticanchor_ash



Leave a reply to Ashwini Kulkarni Cancel reply