“स्वतःसाठी वेळ:”

स्वतःसाठी वेळ:

मी कोण? मला काय आवडतं? मला काय केलं तर आनंद मिळेल? लहानपणी या प्रश्नांची उत्तरं सहज सापडायची. पण आज त्या उत्तरांसाठी खूप विचार करावा लागतो. जबाबदाऱ्या, कुटुंब, आणि आयुष्याच्या प्रवासात स्वतःला विसरणं अपरिहार्य वाटतं. पण खरंच, स्वतःला शोधण्यासाठी वेळ द्यायला नको का?

लहान असताना स्वप्नं खूप सोपी आणि स्पष्ट असायची. कोणीतरी विचारलं, “तुला मोठं होऊन काय करायचं आहे?” तर उत्तर लगेच तयार असायचं. नृत्य, चित्रकला, गायन, लेखन, डॉक्टर, इंजिनीरं —किंवा काहीही! पण हळूहळू जबाबदाऱ्या आल्या, आणि ती स्वप्नं मागे पडत गेली.

शिक्षण, नोकरी, लग्न, कुटुंब… या सगळ्या गोष्टी आयुष्याचा भाग आहेतच. यात आनंदही आहे, पण कधी कधी मनाच्या एका कोपऱ्यात प्रश्न येतो—”हेच का माझं स्वप्न होतं?” सगळ्यांसाठी धावताना, आपण स्वतःसाठी काही करतो का?

स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे मोठं काही करणं नाही. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा—नृत्य, गायन, वादन, लेखन, चित्रकला, छायाचित्रण, तुम्हाला फिरायची आवड असेल तर ते करा.. किंवा फक्त निवांत बसून स्वतःशी गप्पा मारा. यातच खरी ऊर्जा आहे. आपण आनंदी असू, तर आपलं जगणंही सुंदर होईल.

एक कविता सादर करते…

“स्वतःचा शोध”

जगण्याच्या धावपळीत,
स्वतःला कुठे हरवले, कळलंच नाही.
स्वप्नं होती लहानपणी,
पण त्यांच्याकडे बघायला वेळच मिळाला नाही.

जबाबदारीच्या ओझ्याखाली,
मनाच्या इच्छा हरवत गेल्या,
सगळ्यांसाठी धावताना,
स्वतःला मात्र विसरत गेल्या.

थोडा वेळ स्वतःसाठी घेतला,
तरच आनंद सापडेल,
स्वप्नं पुन्हा जिवंत होतील,
आयुष्यही सुंदर भासेल.

स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास सुरू ठेवला, तर आयुष्य अधिक समृद्ध होईल. जबाबदाऱ्या आणि स्वप्नं यांना एकत्र जोडता आलं, तर आनंद आपोआप सापडेल. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढा!☺️

अश्विनी कुलकर्णी
21/02/2025

Leave a comment

I’m Ashwini

Honestly, I’m not a professional writer or anything. I just write sometimes—to clear my head, to feel lighter, or because a random thought won’t leave me alone until I scribble it down.

If even one line here connects with you, makes you pause, smile, or feel something—I’ll call that a win.

Let’s connect